१२ वी ची परीक्षा सुरु झाली आहे. १० वी ची परीक्षा लवकरच सुरु होईल ही वेळ प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. परीक्षा देण्यापूर्वी आणि परीक्षा दिल्यानंतर दोन्ही वेळा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. परीक्षेआधी जितका ताण असतो त्याहून अधिक ताण अनेक विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेनंतर असतो. कारण परीक्षेनंतर त्यांना माहित असते की आपण पेपर कसा सोडवलाय. त्यामुळेच अनेकदा नैराश्यापोटी विद्यार्थी आत्महत्या करतात. १० वी व १२ वी च्या निकालावरच विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक वाटचाल निश्चित होते. ही परीक्षा जितकी महत्त्वपूर्ण आहे तितकीच तणावपूर्ण असते. हा तणाव विद्यार्थ्यांमध्ये झोप न येणे, भूक न लागणे, चिडचिड, डोकेदुखी, पोटदुखी, नैराश्य, परीक्षेत अभ्यासाचा विसर पडणे अशा गोष्टींमधून दिसुन येतो. या सर्वांवर मात करण्यासाठी महत्त्वाचे आहे. परीक्षेच्या तणावाला योग्य रीतीने हाताळून तणावमुक्त परीक्षा देणे. या तणावावर मात करण्यासाठी खालील कानमंत्राचा वापर करावा. परीक्षेची मानसिक तयारी
अ) परिक्षेसाठी अनेक वेळा मुले मानसिकरित्या तयार नसतात. त्यांचा स्वत:वर आपण केलेल्या अभ्यासावर विश्वास नसतो.
ब) नकारात्मक विचार जसे माझा अभ्यास झाला नाही. मला पेपर कठीणच जाणार यामुळे परिक्षेचा तणाव वाढतो. हे नकारात्मक विचार करण्यापेक्षा मेहनत घेऊन आपले चांगल्यात चांगले देणे महत्त्वाचे असते.
क) नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी त्याची जागा सकारात्मक विचारांनी घेणे आवश्यक आहे. मी माझा संपूर्ण प्रयत्न करुन अभ्यास केला आहे आणि मी परीक्षेत चांगली कामगिरी करेन असे विचार मुलांच्या मनात रुजवणे महत्त्वाचे आहे. यात पालकांचा खुप मोठा वाटा असतो.
ड) मानसिक तणाव कमी करण्यासाठी मुलांनी प्राणायम तसेच विविध मानसिक समाधान देणाऱ्या पध्दतीचा म्हणजेच संगीत, योग, नृत्य यांचा अवलंब करणे लाभदायक ठरते. स्वत:वर विश्वास ठेवून आणि मेहनत करुन परीक्षेला सामोरे जाणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. परीक्षेआधी
१) परीक्षेच्या एक दिवस आधी संपर्ण पस्तक वाचणे आणि लक्षात ठेवणे कधी कधी कठीण जाते. अशा वेळी धड्याची किंवा उत्तराची समरी बनवून लक्षात ठेवणे योग्य. चार्टस, की वर्डस.आकृत्या, टेबल्स अशा गोष्टींचा वापर करुन अभ्यास लक्षात ठेवणे सोपे जाते.
२) शक्यतो नवीन धडा किंवा उत्तर जे आधी कधीच वाचले नाही ते परीक्षेच्या एक दिवस आधी वाचणे टाळावे. त्याचा आपल्या इतर अभ्यासावर परिणाम होऊ शकतो.
३) अभ्यासाचे टाइमटेबल बनवणे आणि त्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे. टाईम टेबल एका कागदावर लिहून अभ्यासाच्या टेबलासमोर लावावे.
४) जो भाग कठीण असेल तो सकाळच्या वेळी किंवा झोपण्याआधी वाचावा. तेव्हा आपली स्मरणशक्ती जास्त तल्लख असते.
५) एका वेळी एक तासाहून अधिक अभ्यास करु नये. प्रत्येक एक तासाने १०-१५ मिनीटांची विश्रांती घ्यावी.
६) जेथे कमी व्यत्यय येईल अशा ठिकाणी अभ्यास करावा. जास्त वेळ अभ्यास करण्यापेक्षा जास्त लक्ष देऊन अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.
परीक्षेनंतर परीक्षा किंवा पेपर झाल्यानंतर त्या पेपरबद्दल इतरांशी बोलणे टाळावे जर चर्चा केलीच तर त्या पेपरचा तणाव घेणे टाळावे कारण तो पेपर झाला असून त्या पेपरचा तणाव मनावर घेऊन काहीही निष्पन्न होणार नाही, हे लक्षात घ्यावे
पुढील पेपरची तयारी करण्याबद्दल चर्चा किंवा विचार करावा.
झालेल्या पेपरमधील उत्तरबद्दल शंका असली आणि आपण पडताळून पाहिली तरीही पेपर आता झाला असून पुढील पेपरचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्यावे.
झालेल्या पेपरबद्दल चर्चा करुन किंवा त्याबाबतचा तणाव मनात ठेवून पुढील पेपरचा अभ्यास करता येत नाही. त्यामुळे नैराश्य येते त्यामुळे मागील पेपरची चर्चा करण्यापेक्षा येणारा पेपर कसा सोडवावा किंवा त्या पेपरचा अभ्यास कसा करायचा याबाबत विचार करा.
विद्यार्थी मित्रांनोपरीक्षेआधीच्या आणि परिक्षेनंतरचा कानमंत्र त्याचा जरुर विचार करा.आता तणाव कसा घालवायचा आणि तणाव मुक्त परीक्षा कशी द्यायची हे सर्वस्वी आपल्याच हातात असते. सर्व विद्यार्थी मित्रांना हार्दिक शुभेच्छा !