होळी खेलोर राम जनम दिनोर
होळी खेलोर, असी धरती पर
राम लक्ष्मण खेले, उनके पिछे
खेल रही सब दुनिया, धरतीतोपर आमर रखाड
जिवडा धरतीतोपर !
मंडळी हे गीत आहे बंजारा समाजात मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा करण्यात येणाऱ्या होळी सणाच्या काळात गायले जाणारे 'लेंगी गीत'. होळी हा सण भगवान श्री. रामाच्या काळापासून खेळला जात आहे. होळी सण भविष्यातही असाच अखंड खेळला जाणार आहे. रुढी व परंपराप्रिय बंजारा समाजात साजरा होणाऱ्या होळी या सणाविषयी हे विवेचन... प्राचीन काळापासून द्रयाखोऱ्यात वावरणाऱ्या बंजारा समाजाचा इतिहास बंजारा लोक संस्कृतीमधून दिसून येतो. बंजारा समाजाचा होळी उत्सव म्हणजे ग्राम रंगभूमीवरील आविष्कार म्हणावा लागेल. होळी व धुळवडीच्या पार्श्वभूमीवर शहरात डीजे आणि सालसाच्या तालावर लोकं बेधुंद होतात. बंजारा समाजाच्या होळीचं सांस्कृतिक वेगळेपण अजूनही कायम आणि ते भविष्यातही कायम राहील. बंजारा समाजातील होळी उत्सव गावातील वेगवेगळ्या ठिकाणी तीन दिवसांपर्यंत धुमधडाक्यात साजरा केला जातो. प्रत्येक समाजातील लोकसंस्कृतीत, सण आणि उत्सवांमध्ये वैशिष्ट्ये असतात. त्याप्रमाणे बंजारा लोकसंस्कृतीमध्येही होळी उत्सवाचे विशेष महत्त्व दिसून येते. विदर्भातील यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलडाणा आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यात प्रामुख्याने बंजारा समाज विखुरलेला आहे. त्याशिवाय सोलापूर, जळगाव या जिल्ह्यातही बंजारा समाजातील बांधवाचे अस्तित्व आहे. या जिल्ह्यातील बंजारा समाजात होळीचा सण अतिशय आगळ्या-वेगळ्या स्वरुपात फाल्गून महिन्यात साजरा होतो.
होळीमध्ये ‘लेंगी गीत' गायली जातात. लेंगी गीतांमध्ये होळीचे वर्णन केलेले असते. लेंगी गीताचे दोन प्रकार आहेत. घुमर लेंगी बैठक लेंगी असे. घुमर लेंगी या गीत प्रकारात डफाच्या तालावर स्त्री-पुरुष गोलाकार वर्तुळात नाचत असतात. 'बैठक लेंगी' प्रकारात एका समुहाने बसून डफाच्या तालावर गायन करायचे असते. या लेंगी गीतावर अबालवृध्द या उत्सवात लेंगी गीत गात-गात नृत्यही सादर करतात. लेंगी गीत गात असताना डफाच्या आवाजाने वातावरण निर्मिती होते. बंजारा समाजाच्या घराघरात, गल्लीगल्लीत, तांड्या तांड्यावर एकूणच गल्लीपासून दिल्लीपर्यंत लेंगी नृत्याच्या धमालीने परिसर निनादला जातो. संस्कृती, चालीरिती जपत आकर्षक पोशाखात स्वबोलीच्या तालावर लेंगी म्हणत म्हणत पाय थिरकायला सुरुवात होते. सरतेशेवटी होळीचे लोण तांड्याकडे येऊ लागते. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला होळीच्या दिवशी सुरुवात होते. याच दिवशी नायकांच्या (तांड्याचा प्रमुख) घरासमोर पुरुष मंडळी जमा होऊन लेंगी गीत गातात. मुळात बंजारा समाज नृत्य व गायनप्रिय असल्यामुळे होळी सणात आपली नृत्य व गायनाची तो पूर्ण हौस भागवून घेतो. तीन दिवस हा उत्सव तांडयावर चाललेला असतो. इतर समाजामध्ये होळी ही आदल्या दिवशी सायंकाळी पेटवली जाते परंतु बंजारा समाजामध्ये दुस्रया दिवशी सकाळी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी होळी पेटवली जाते. असे केल्याने जनावरं वर्षभर आजारी पडत नाहीत असा समज आहे. धुळवडीच्या दिवशी नृत्याच्या तालावर लेंगी म्हणत प्रत्येकाच्या घरी जाऊन गेर मागण्याची प्रथा आहे. तांड्यावरच्या या सामूहिक उत्सवामुळे बंजारा समाजात एकात्मता निर्माण झाल्याचे दर्शन घडते. समाजाची प्रगती साधण्यासाठी, बंजारा समाजाच्या लोककला रुढी आणि परंपरा प्रवाहित राहण्यासाठी होळी उत्सव बंजारा समाजाच्या लोककला रुढी आणि परंपरा प्रवाहित राहण्यासाठी होळी उत्सव बंजारा समाज जीवनाचे महत्त्वपूर्ण अंग ठरला आहे असे म्हणता येईल. होळी उत्सवात बंजारा समाजाच्या प्रत्येक तांड्यावर लेंगी नृत्याची अशी धमाल दिसते. पाल, फाग आणि गेर असे तीन दिवस बंजारा समाजात होळीचा उत्सव साजरा करण्यात येतो. लेंगी नृत्य हे यातील प्रमुख आकर्षण असते. बंजारा लेंगी गीत आणि नृत्यातून देवी-देवताची महती सांगण्याची आणि त्यातून समाजप्रबोधनाची ही एक अतिशय प्राचीन परंपरा आहे.