उल्हासनगर, दि. ३/प्रतिनिधी : एका इसमाला १०० ग्रॅम वजनाचे नकली सोन्याचे बिस्कीट देऊन त्यांच्याकडून ३ लाख रूपयाची रक्कम घेऊन पसार झालेल्या एका इसमासह महिलेला विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार शहरातील कॅम्प नं. येथील कुर्ला कॅम्प परिसरात त्रिमुर्ती केमीस्ट अॅण्ड ड्रगिस्ट मेडीकल नावाचे शॉप आहे. त्या शॉपमध्ये नरेंद्र वारूळे (५१) हे बसले असताना त्यांच्या तोंड ओळखीचा उदयभान पांडे व त्याच्या सोबत काळया रंगाच तोंडाला स्कार्फ बांधलेली महिला वारूळे यांच्या मेडीकलमध्ये आली. त्यांनी त्यांच्याकडे १०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट आहे त्याच बिस्कीटच्या बदल्यात ३ लाख रूपये द्या असे वारूळे यांना सांगितले. वारूळे यांनी ते बिस्कीट घेऊन ३ लाख रूपये त्या दोघांना दिले असता ते पैसे घेऊन पळून गेले. दिलेले सोन्याचे बिस्कीट हे नकली असल्याचे वारूळे यांना समजताच त्यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात जाऊन उदयभान पांडे (६२) व नेहा इंद्रिस (२९) अशा दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक रमेश भामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक राजपूत व साळवे यांनी उदयभाम व नेहा या दोघांनाही शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक साळवे करीत आहेत.